महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती म्हणजे मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट करण्याचे षडयंत्र, हिंदीसक्तीचा निर्णय तात्काळ रद्द करा : एसएफआय विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन निर्णय रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती म्हणजे मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट करण्याचे षडयंत्र, हिंदीसक्तीचा निर्णय तात्काळ रद्द करा : एसएफआय विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन निर्णय रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा

वडवणी : प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करून हिंदी सक्तीचे धोरण अवलंबले गेले. या निर्णयाच्या विरोधामध्ये विद्यार्थी, शिक्षणतज्ञ, बुद्धिजीवी, साहित्यिक, कवी, लेखक आणि वेगवेगळ्या पक्ष संघटनां सोबतच महाराष्ट्र व मराठी प्रेमी जनतेने हिंदी सक्तीला तीव्र विरोध केलेला होता. महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा कल लक्षात घेवून मराठी जनविरोधी सरकारने महाराष्ट्रात हिंदी सक्ती केली जाणार नाही असे आश्वासन दिले. तसे जाहीर प्रकटन शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांनी केले होते. परंतु आता शुद्धिपत्रक काढून वीस विद्यार्थ्यांची अट टाकत सरकारने हिंदी सक्तीची केली आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही स्वरुपात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जाहीर करते.

शिक्षण तज्ञांच्या मते प्राथमिक शिक्षण मातृभाषेत दिल्यास इतर विषयांचे शिक्षण घेणे सोपे जाते. त्यामुळे पहिली ते पाचवीचे शिक्षण मराठी भाषेतून दिले जावे. या वयामध्ये मातृभाषेत शिक्षण दिले गेले तर ते बौद्धिक विकासासाठी पूरक असते. पाचवी नंतर त्यामुळे इतर भाषा व विषय शिकणे सोपे जाते. या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारची भाषा सल्लागार समिती, शिक्षण सुकाणू समितीतील तज्ञ सदस्यांनी हिंदी सक्ती व त्रिभाषा सूत्राला विरोध केलेला होता. या सर्व विरोधाला डावलून सरकार हिंदीची सक्ती करत आहे. महाराष्ट्रातील सरकारवर केंद्र सरकार वा अन्य कुणाचा दबाव आहे का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने हिंदीची सक्ती करून मराठीवर बुलडोझर फिरवायचा हा दुटप्पीपणा मराठी जनतेने समजून घेतला पाहिजे आणि आपल्या माय मराठीच्या रक्षणासाठी कंबर कसली पाहिजे.

एखादी भाषा ही केवळ भाषा नसते. भाषेमध्ये संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतात. महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी भाषेमध्ये पुरोगामी, मानवतावादी विचारांची मुळे खोलवर रुजलेली आहेत. संत परंपरेतून समृद्ध झालेली मराठी भाषा, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा करून दूरदृष्टीचा विचार केला. महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांनी मराठी जनमताला हात घालून तो वारसा अधिक समृद्ध केला. मराठी बाणा टिकावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी वीर-वीरांगना शहीद झाल्या. हा वारसा नष्ट करण्यासाठी हिंदीची सक्ती केली जात आहे. प्राणपणाने आपला हा ऐतिहासिक वारसा आपण पुढे नेला पाहिजे. सरकारने वीस विद्यार्थ्यांची अट टाकून काढलेले हिंदी सक्तीचे शुद्धिपत्रक मागे न घेतल्यास एसएफआय राज्यभर विद्यार्थ्यांना व नागरिकांना संघटित करू आंदोलन करेल असा इशारा विद्यार्थ्यांनी वडवणी तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनामार्फत दिला आहे. यावेळी एसएफआयचे राज्य सहसचिव लहू खारगे ,राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सत्यजित मस्के, तालुकाध्यक्ष करण साळवे, तालुका उपाध्यक्ष अभिषेक हातागळे, आस्तिक साबळे, निखिल वाघमारे, तुषार हातागळे, सत्यजित गलांडे, सुमित व्हावळकर आदी विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment