एसएफआय १८ वे अखिल भारतीय अधिवेशनासाठी लहू खारगे, पवन चिंचाणे, हर्षा चव्हाण, सुग्रीव मंदे यांची निवड
बीड (ता. २५) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे १८वे अखिल भारतीय अधिवेशन केरळच्या कोझिकोड (कालिकत) येथे दिनांक २७ ते ३० जून २०२५ रोजी होत आहे. या राष्ट्रीय अधिवेशनासाठी बीड जिल्ह्यातील लहू खारगे, पवन चिंचाणे, हर्षा चव्हाण आणि सुग्रीव मंदे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. एसएफआयचे राज्य अध्यक्ष रोहिदास जाधव आणि राज्य सचिव सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रतिनिधी या अखिल भारतीय अधिवेशनास जात आहेत.
या अधिवेशनाच्या निमित्ताने शेवटच्या दिवशी भव्य रॅली आणि विद्यार्थ्यांची सभा होईल. एसएफआयचे माजी नेते आणि केरळचे विद्यमान मुख्यमंत्री कॉम्रेड पिनराई विजयन हे सभेला संबोधित करणार आहेत. तसेच एसएफआयचे अखिल भारतीय अध्यक्ष अध्यक्ष व्ही. पी. सानू आणि महासचिव मयुख बिस्वास हे सभेचे वक्ते असतील.
या अधिवेशनासाठी निवड झालेले प्रतिनिधी पैकी लहू खारगे हे वडवणीचे असून ते एसएफआयचे राज्य सहसचिव आहेत. पवन चिंचाने हे माजलगावचे असून ते जिल्ह्याचे सचिव आहेत. हर्षा चव्हाण ही अंबाजोगाईची असून ती शालेय प्रतिनिधी आहे. सुग्रीव मंदे हा धारूर तालुक्यातील असून तो सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे. आहेत. सुग्रीव याने माउंट एव्हरेस्ट सर केलेले असल्याने अधिवेशनात त्याचा सन्मान होईल. तो विशेष प्रतिनिधी म्हणून निवडला गेला आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून जवळपास १ हजार प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. बीड जिल्ह्यातून निवड झालेल्या प्रतिनिधींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या अखिल भारतीय अधिवेशनाची गेल्या वर्षभरापासून जोरदार तयारी सुरू आहे. एसएफआयच्या विद्यार्थी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यांपैकी केरळ हे एक महत्वाचे राज्य असून हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे. आजवर एसएफआयने विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून अनेक कणखर नेतृत्व समाजाला व देशाला दिले असून ही परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे याकडे देशातील विद्यार्थी वर्गाचे व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्यासह समाजमाध्यमांचे लक्ष लागून आहे. या अधिवेशनात देशातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा व विचारमंथन करण्यात येणार आहे. अधिवेशनात आगामी काळातील कामाचा आराखडा निश्चित केला जाईल आणि काही महत्त्वाचे ठराव मांडले जातील.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थी चळवळीत विद्यार्थी प्रश्नावरती सक्रियपणे अनेक निवेदने, मोर्चे, आंदोलने करत आवाज उठवून या प्रश्नांवरती काम करत असल्या कारणाने लहू खारगे, पवन चिंचाणे, हर्षा चव्हाण व सुग्रीव मंदे यांची अखिल भारतीय अधिवेशनासाठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल समाजाच्या सर्वच घटकातून अभिनंदनचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
