वडवणीत तिरुपती प्रायमरी स्कूल मध्ये रंगला पैठणीचा खेळ..!
वडवणी दि.4 (प्रतिनिधी) :- येथील तिरुपती प्रायमरी स्कूल मध्ये माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सौ.रंजना शाम जाधव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. सदरील कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला. शाळेच्या वतीने महिलांना वाण म्हणून संसारउपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणगोपाळ गोपालन संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनिता बंडूजी खांडेकर तर उद्घाटक म्हणून
पत्रकार गीतांजली लव्हाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.उषाताई सूनीलराव मुंडे व सौ.रचनाताई नहार यांची उपस्थिती होती. यावेळी हळदी – कुंकू तसेच तीळ गूळ देत महिलांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. वर्षा सोळंके यांनी तर प्रास्ताविक गणेश सोळंके यांनी केले. कार्यक्रमास शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वडवणी येथील हिंगलाज माता मंदिर परिसरात असलेल्या तिरुपती प्रायमरी स्कूल मध्ये नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. शाळेत नुकताच माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. यावेळी महिलांसाठी धावत जाऊन अगदी छोट्या पेल्याने बाटली भरणे व उखाणे स्पर्धा असे खेळ घेण्यात आले. स्पर्धेत सौ.रंजना शाम जाधव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर द्वितीय येण्याचा मान सौ.शिल्पा कवचट यांनी मिळवला, त्यांना चांदीची तिरुपती प्रतिमा भेट देण्यात आली. सौ. वैष्णवी परमेश्वर नरवडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला, त्यांना चांदीची वाटी व चमचा देण्यात आला. स्पर्धेत शेकडो माता पालकांनी सहभाग नोंदवला. उपस्थित महिलांनी टाळ्या वाजवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
स्कूल मधील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा सादर केल्या. त्यामध्ये जिजामाता यांची वेशभूषा कु.स्वरा सोळंके तर झाशीची राणी कु.सानिका आळणे, महात्मा गांधी चि.समर्थ मदने, लोकमान्य टिळक चि.विराज शिंदे,भगतसिंग समर्थ घुमरे, सुभाषचंद्र बोस चि.आकाश चोरमले, महात्मा ज्योतिबा फुले चि.सौरभ गार्डी, सावित्रीबाई फुले चि.स्वरा चोरमले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चि.साई कवचट छत्रपती शिवाजी महाराज चि.ऋतुराज वरकड यांनी केल्या होत्या.
