ना दारू, ना मटका ना कोणत्या वादात, तरुण रंगणार बैलगाडा शर्यतीच्या नादात…आषाढी एकादशी निमित्त वडवणी तालुक्यातील काडीवडगाव शिवारात बैलगाडी शर्यतीचा थरार
महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा म्हणजेच आषाढीवारी आणि या निमित्ताने वडवणी तालुक्यातील सर्वच गावांच्यावतीने आयोजित केली जातेय सर्वांच्याच जिव्हाळ्याची बळीराजा बैलगाडा शर्यत.
शेतकऱ्यांच्या लेकरांएवढाच जपला जाणारा दावणीचा बैल आणि त्याचे शेतीचे नाते हें कोणत्याच मातीशी नाळ असलेल्या व्यक्तीस नव्याने सांगण्याची गरज नाही. ग्रामीण भागात अनेक जत्रा आणि उरूसांमध्ये अनेक वस्तदांच्या तालमीतील पैलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरलेले अनेक ठिकाण आणि सामने जिल्हाभरातील जनता पहात आलेली आहेच. परंतू आत्ता यावेळी पंढरपूराच्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेऊन आलेल्या तरुणांनी यावेळी आयोजित केलाय आगळा वेगळा असा बैलगाडा शर्यतीचा आखाडा. या आखाड्यात स्पर्धक असणार आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालकांच्या तालमीतील जातिवंत बैल, या बैलगाडा शर्यतीचे आयोजन काडीवडगाव या गावात करण्यात येत आहे वडवणी तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांच्या माध्यमातून केले जात आहे, सदर शर्यत ही १३ जुलै रोजी पार पडणार असल्याचे समजते तसेच पहिल्या ७ विजेत्यांसाठी मिळून लाखो रुपयांचे बक्षीस देखील आयोजकांनी घोषित केले आहे.
वडवणी तालुक्यातील युवकांचा हा आगळा वेगळा नाद म्हणजेच जवानीच्या नादात दिवाणी होऊन धाब्यावर बसण्यापेक्षा आखाड्यात उतरण्याचा, शेतकरी संस्कृतीचा सन्मान आणि कास्तकार असल्याचा अभिमान या आयोजनातून दिसून येणार आहेच. या शर्यतीच्या आयोजनासाठी तरुण शेतकरी पुत्रांमध्ये अत्यंत उत्साही आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, या बळीराजा बैलगाडा शर्यतीचे प्रमुख आयोजक सतिश पांडव, प्रकाश आण्णा झाटे, पैलवान नितीन घुगे, बशीर शेख यांच्यासह संपूर्ण वडवणी तालुक्यातील तरुण वर्ग आहे.
